आपल्या आसपास अशा काही घटना घडत असतात की मनात भावभावनांचा कल्लोळ उठल्याशिवाय राहत नाही. काही दिवसांपूर्वीँची गोष्ट..माझी exam चालू होती. theory papers संपून orals चालू होत्या.एक दिवस ब्रेक मधे हॉस्पीटलहून कॉलेजकडे जात होतो. रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर एक माणूस बसलेला दिसला.. केस विस्कटलेला, हाडांची काडं झालेला तो शून्यात नजर लावून बसला होता. कमरेभोवती एक अतिशय मळकट-कळकट कापड गुंडाळलेले.. इतकाचं काय तो पोशाख.. त्याच्या आजुबाजूला घाण होती. त्याचं त्याला काही भान नव्हतं... मला खूपच feel झालं... तरीही नेहमी वेगवेगळ्या रूपात दिसणारं दृश्य म्हणून मी विसरून गेलो. त्या रात्री जोराचा पाऊस पडला..
पुन्हा दुसय्रा दिवशी त्याच वेळी तो तिथेच तसाच बसलेला.. मला राहवलं नाही. रात्री एवढा पाऊस.. सकाळची थंडी माझ्या शर्ट-एप्रन मधूनही मला जाणवणारी.. आणि हा मनुष्य असाच.. उघडा-वाघडा.. मनाशी काहीतरी ठरवलं आणि रूमवर आलो. दुसय्रा दिवशी सकाळी माझा एक जुना शर्ट सोबत घेतला आणि हॉस्पीटल ला आलो. ब्रेक मधे बाहेर आलो तर तो तिथेच...तसाच.. सोबतच्या मित्रांना पुढे जाऊ दिलं..थोडं आजुबाजूला पाहिलं आणि त्याच्या पुढे गेलो..शर्ट त्याला देऊ केला...तर त्याने मला धक्काच दिला... त्याने चक्क शर्ट घ्यायला नकार दिला. मी त्याला बराच वेळ आग्रह करत राहिलो..तर तो मला नको..नको एवढंच म्हणत होता. खरं म्हणजे मी हा धक्का पचवू शकत नव्हतो..पण माझा नाईलाज झाला.. मी तसाच तिथून निघालो.
त्यानंतर तीन दिवस दररोज मी त्याला पाहत होतो..तो तसाच तिथेच बसलेला असायचा..
पहिल्यांदा त्याला पाहिल्यावर जितका विचार केला नसेल तेवढा विचार या शर्टच्या प्रसंगानंतर केला. थंडी, वारा, ऊन, पाऊस..कशाचा त्याला फरक पडत नव्हता. तो जसाच्या तसा.. काय खात असेल?.. कसा जगत असेल?..।
आमच्या आयुर्वेदामध्ये अशा लक्षणांचा एक व्याधी वर्णन केला आहे..उन्माद.. त्याला उन्माद झाला होता का?... जर त्यानं शर्ट घेतला असता तर काय झालं असतं..? त्यानं मला काय मिळालं असतं..? समाजसेवेचं पुण्य?.. काहीतरी वेगळं केल्याचं समाधान?...
कदाचित मला काही मिळालं असतं-नसतं... पण.... पण त्याला लाचार ही पदवी मात्र नक्की मिळाली असती... म्हणजे तो स्वाभिमानी होता का? पण तसं असेल तर मग स्वाभिमानी माणूस इतका निष्क्रीय कसा? कारण तो तर नेहमी तसाच बसलेला असायचा.. दुसय्राकडून काही घ्यायचं नाही तर मग स्वतः ते मिळवण्यासाठी धडपड तरी त्यानं केली पाहिजे होती.. काहीही असेल, पण माझ्या मनात लाचारी, स्वाभिमान, हतबलता, विषमता, संवेदनशीलता, संवेदनशून्यता या भावभावनांचा कल्लोळ उठला... पण त्या माणसाचे पुढे काय? याचे उत्तर नाहीच मिळाले....