शनिवार, १ सप्टेंबर, २०१२

*महावीर*

मनाला खूप भावलेल्या या काही ओळी... . तो महावीर कित्येकात आहे प्रत्येकात आहे खोल-आत-उपजत भावित पूजित परिचित पण बहुतेकातला महावीर आहे मूर्च्छित! त्याला जाग यावी पण जाग यायला लागते आग-वेड-संकल्प उरात खोल रूतावा लागतो एक बाण एक तीर तेव्हा युगायुगातून जन्मतो एखादा 'महावीर' जो कधी मरत नाही दृष्टी पुढून सरत नाही काळापुढे ढळत नाही प्रतिमा त्याची मिटत नाही...

शनिवार, २६ मे, २०१२

"उत्तम संयम"

"उत्तम संयम"


YOUR FREEDOM COMES FROM BEING IN CHARGE OF YOURSELF.

"उत्तम सत्य"

"उत्तम सत्य"


*सत्य केवळ बोलण्यापुरते
नाही तर मनाने सत्
स्वरूपाचे चिंतन, वाचेने
सत् स्वरूपाचेच कथन
आणि कायेने सत् स्वरूप
आचरण, उत्तम सत्य होय.

व्यवहारातही सत्य चिंतन, सत्य वचन आणि सत्य आचरण सात्त्विकतेचे द्योतक मानले जातात.
सत्याचा हा प्रासाद बांधण्यासाठी मात्र इच्छाशक्तीचा भरीव पाया लागतो, आत्मविश्वासाचे मजबूत स्तंभ लागतात, योग्य ज्ञानाचे छत लागते आणि निर्भयतेचे शिखर लागते.

'खय्राची दुनिया नाही राहिली' यातून एक पळवाट, स्वतःच्या अयोग्य आचरणाचे समर्थन, पर्यायाने निराशावाद दिसून येतो.
व्यवहारात नातेवाईकांना आप्त म्हणतात.
आयुर्वेदात आप्ताची व्याख्या सांगताना म्हटले आहे,

'आप्तानां वाक्यम् असंशयं सत्यम्।'

म्हणजे रज, तमापासून मुक्त असल्याने आप्तांचे शब्द हे निःसंशय सत्य असतात. आयुर्वेद हा असाच आप्तप्रणीत आहे.

उत्तम सत्याची साधना करून प्रत्येक व्यक्ति अशी आप्त बनू शकते.

'सत्यमेव जयते, नानृतम्।'

"उत्तम शौच"

"उत्तम शौच"


*मनाच्या शुद्धतेची
भावना,शौच होय.

'लोभप्रकारस्योपरमः
शौचम्।'


*जीवित,इंद्रिय,आरोग्य,
भोग्य सामग्री या
लोभप्रकारांचा त्याग,उत्तम
शौच
होय.

लोभ आणि इच्छा यातील सीमा तशी फार धूसर आहे. पण या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. एखाद्या गोष्टीची इच्छा करणे, यात आशावाद,प्रयत्नवाद साठलेला असतो तर लोभामध्ये निराशावाद गोठलेला असतो, ईप्सितासाठी कोणत्याही थरापर्यंत जाण्याची तयारी असते.

कुणीतरी म्हटलंय, क्रोध मस्तकात राहतो तर लोभ पोटात राहतो जे कधीच भरत नाही.
                    
बय्राचदा पत्राच्या शेवटी असते, 'कळावे,लोभ असावा'. तसं पाहिलं तर शेवटी दुःखाचंच कारण. पण इतका विरक्तीचा विचार जरी करायचा नसेल तरी लोभाने मनाचा क्षोभ होतो हे नक्कीच.
अति तेथे माती, लोभः पापस्य कारणम् यासारखी सुभाषिते आणि सोन्याचे अंडे देणारी कोँबडी सारख्या कथा दुसरे काय सांगतात...?

"उत्तम आर्जव"

"उत्तम आर्जव"

मन,वचन,कायेची कुटिलता न करणे,आर्जव होय.
ऋजुता,सरळपणा,साधेपणा जितका सरल तितका बाणवणे कठीण.
सरळस्वभावी व्यक्ति विश्वासास पात्र ठरते, वाकड्यात शिरणारी संशयास.
स्वभावाला औषध नाही हे खरं असलं तरी दुसय्राचं अहित करायचं कारणच नसेल तर विचारात,बोलण्यात,कृतीत नेहमी सरलताच राहील.
उत्तम आर्जवाच्या आराधनेतून विश्वास,आशावाद,कृतिशीलता,आनंदी
वृत्ती निर्माण होते.
म्हणून तर ज्ञानेश्वरमाऊली अखिल विश्वासाठी पसायदान मागताना म्हणतात..
खळांची व्यंकटी सांडो!
(दुष्टांचा वाकडेपणा नष्ट होवो)

"उत्तम मार्दव"

"उत्तम मार्दव"

   जाति, कुल, रूप, ज्ञान, धन वगैरेँचा गर्व न करणे, मार्दव होय.
मृदुता हा आत्म्याचा मूळ स्वभावच आहे. पण मीपणाची भावना त्यास कर्मबंधनात बांधते.
मार्दवतेचा अंगीकार करून आपल्या मूळ तत्त्वाकडे जाणे हीच तर जीवनाची इतिकर्तव्यता असते.
'इदं न मम' ही वृत्ती उत्तम मार्दवतेतूनच तर येते.
अहंकाराचा त्याग करूनच तर मनुष्य देवत्व प्राप्त करू शकतो.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या या साध्या शब्दात किती गहन अर्थ सामावलेला आहे...
"अहंकार गेला।
तुका म्हणे देव झाला।।"

"उत्तम क्षमा"

"उत्तम क्षमा"


खामेमि सव्वे जीवा
सव्वे जीवा खमंतु मे।
मित्ती मे सव्वभूएसु
वेरं मज्झं न केणइ।।


(जगातील सर्व प्राणीमात्राची
आम्ही क्षमा मागतो.
सर्वाँनी आम्हास क्षमा करावी.
सर्व प्राणीमात्रांविषयी आम्ही मित्रत्वाची भावना बाळगतो.
आमचे कुणाशीही वैर नाही.)


क्षमेतून विनय येतो. विनयाने विद्या, बुद्धी, बल, रूप, यश या गोष्टी प्रकाशमान होतात. त्याने शत्रु जिंकले जातात.
आणि जर का ही उत्तम क्षमा असेल, तर रागद्वेषादि जन्मजन्मांतरीचे शत्रुही जिँकले जातात.